Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा:पालकमंत्री संजय राठोड

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करा:पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मध्यरात्रीपासून सततधार, मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागात तात्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच नागरिकांनी आपत्ती परिस्थितीत प्रशासनाला संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्ण दिवसरात्र पाऊस सुरू राहणार असून पुढील ७ दिवस असाच पाऊस सुरू राहणार आहे. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात. परिस्थितीनुसार शाळा,महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत कार्यवाही करावी. जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मुसळधार पावसामुळे शेती बाधित होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचीही परिस्थिती ओढावू शकते, त्यामुळे नुकसानग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ पंचनामे सुरु करावे. तसेच जिल्हा आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षांनी सतर्क राहावे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देवून अतिवृष्टी, पूर परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. राठोड यांनी केले आहे.


उपविभागीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना स्थानिक स्तरावरील परिस्थिती पाहून सुट्टी देण्याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या तसेच तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.


यासह गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल आणि इतर क्षेत्रीय कर्मचारी हजर राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. मोठे, मध्यम व लघू प्रकल्पाच्या परिसरात होणारे पर्जन्यमान व प्रकल्पातील विसर्गाबाबत संबंधित गावांमध्ये सावधानतेचा इशारा व उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व यंत्रणांनी आपसात संपर्कात राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून नागरिकांनाही सावधगिरी बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad